शिवेश्वर महादेव
मंदिर – भाविकांचे श्रद्धास्थान
शिऊर येथील वरचा पाडा भागात असलेले शिवेश्वर
महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून या मंदिरातील मूर्ती पितळी असल्याने या
मंदिरास पितळी महादेव म्हणूनही संबोधले जाते.
या मंदिरातील मूर्ती पंचधातूपासून बनविलेली असून
मूर्तीचे वजन ३० किलो आहे. मूर्तीच्या
जटातून गंगा, मूर्तीमागे अष्टफणी नाग, मूर्तीखाली दगडी पिंड, व लिंग व त्यावर आकर्षक मूर्ती विराजमान आहे.
सुमारे ३०० वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी ४००
पोते ज्वारी विकून ही महादेवाची मूर्ती अर्पित केली, परंतु बंधूच्या धाकाने
त्यांनी ही मित्राच्या घरी ठेवली ती बातमी दुसऱ्या बंधूस मिळाल्यावर त्यांनी ती
मूर्ती आणावयास सांगितले व स्वतः च्या जागेवर सागाचे मंदिर बांधले. कालांतराने ते
मंदिर पडले, मंदिर पडल्यानंतर ती मूर्ती २० ते २५ वर्ष रावणेश्वर येथील मंदिरात
ठेवण्यात आल्यानंतर झाल्टे परिवाराने पुन्हा मंदिर स्थापन करून त्या मूर्तीची
स्थापना केल्याचे शिवनाथ झाल्टे यांनी सांगितले.
मंदिरातील सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून ते कै.कचरू
झाल्टे यांच्या स्मरणार्थ झुंबरबाई झाल्टे यांनी आपल्या स्वखर्चातून मंदिराचे काम
केले आहे. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तर दैनदिन
हरिपाठ, भजन, आरती करण्यात येते. श्रावणमास निमित्ताने या मंदिरात ग्रंथवाचन
करण्यात येत आहे.
या मंदिराबरोबरच खोलेश्वर, माणकेश्वर व काकूळा
येथील नर्मदेश्वर येथील महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त देखील भाविकांची
गर्दी होते.
