बससेवेला शिऊरच्या बसस्थानकाचे वावडे, सुविधा नसल्याने प्रवाश्यांचे हाल,प्रवाशी,लोकप्रतिनिधी यांच्या प्रतिक्रिया
शिऊर / सौरभ लाखे
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असा बिरूद
मिरवणाऱ्या व स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न पाहणाऱ्या शिऊर गावाच्या बसस्थानकाचे
परिवहन महामंडळाच्या बसेसला वावडे असून बस स्थानकात न येताच
महामार्गावरच थांबते तर लांब पल्यांच्या बस मध्ये शिऊरकरांना “एन्ट्री” देखील दिली जात
नसल्याने ग्रामस्थांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शिऊर
या गावास ऐतिहासिक,अध्यात्मिक, पौराणिक महत्व असून या गावात सातत्याने विविध
उत्सवनिमित्ताने भाविक येत असतात, “प्रवाशांच्या सेवेसाठी”
असा तोरा मिरवणाऱ्या राज्य
परिवहन महामंडळाला शिऊर गावाबद्दल कुठलेही सोयरसुतुक नसल्याने एसटीच्या या
मनमानी कारभाराबद्दल ग्रामस्थांसह भविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
औरंगाबाद- नाशिक
महामार्गावर वसलेल्या शिऊर गावात सातत्याने
प्रवासीवर्गाची वर्दळ असते.
येथे शाळा – महाविद्यालय असल्याने
बाहेर गावचे विद्यार्थीही अध्ययनासाठी
येथे येतात.मात्र एसटी चा गलथान कारभार
त्यानाही भोवत असल्याने त्यांचे
शैक्षणिक नुकसान होते. विशेषतः नाशिक
आगाराच्या काही बसेसमध्ये शिऊर येथील
प्रवाशांना अपमानास्पद वागणूक दिली जात
असल्याची प्रवाश्यांची तक्रार आहे.
राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे
कार्यतत्पर व कर्त्यव्यकुशल म्हणून
ओळखले जातात. त्यांनीच याबाबत लक्ष
द्यावे अशी मागणी जोर धरत आहेत.
प्रवाशांना
बसच्या प्रतीक्षेसाठी बसस्थानक उपलब्ध आहे मात्र या बसस्थानकाची
परिस्थिती “असून अडचण,नसून खोळंबा” अशी झाली आहे.काही बसेसचा अपवाद वगळता बाकी
बसेसला बसस्थानकाचे वावडे असून बस स्थानकात न येताच महामार्गावरच उभी
राहत असल्याने अंध,अपंग वृद्ध प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत
आहे.बसच्या प्रतिक्षेत महामार्गावर उभे राहावे लागत असल्याने दुर्घटना घडण्याची
शक्यता नाकारता येत नाही.तर काही लांब पल्याच्या बसेस महामार्गावर
थांबण्याची तसदीही घेत नाही.तर या बसेस मध्ये शिऊर ला उतरणाऱ्या
प्रवाश्यांना बसमध्ये बसण्यास स्पष्ट नकार दिला जातो किंबहुना त्यांना बस मध्ये “एन्ट्री” देखील दिली जात नाही.एखाद्या वेळेस बस थांबली तर स्थानकात येण्याचे तर सोडाच मात्र महामार्गावर देखील
कित्येक दूरवरच या बसेसला ”ब्रेक” लागतो.
बाजारपेठेचे गाव
असलेल्या शिऊरमध्ये दर रविवारी आठवडी
बाजार भरतो तर कृषी उत्पन्न बाजार
समितीची उपबाजारपेठ देखील आहे. पोलीस
ठाणे,प्राथमिक आरोग्य
केंद्र,राष्ट्रीयकृत बँक व तीर्थक्षेत्र असून या गावाची लोकसंख्या
किमान १७००० हजार आहे. मात्र या कुठल्याच बाबींसोबत या महामंडळाला
काहीच देणे घेणे नसल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येते.
अपघाताचे प्रमाण वाढले
भरधाव बसेस शिऊर बसस्थानकात न येताच
महामार्गावरच थांबत असल्याने या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून बसच्या
चाकाखाली दुचाकी अडकल्याने एक दुचाकीस्वार या घटनेत बालंबाल बचावला तर
महाविद्यालयातील विद्यार्थी, वृद्ध, महिला यांना बसमध्ये चढ – उतारासाठी
तारेवर्स्ची कसरत करावी लागत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत
नाही.
कित्येक निवेदनाला “खो”
या बसस्थानकाची दुरुस्ती करून सुविधा उपलब्ध करूनदेण्यासह सर्व बसेस स्थानकात याव्यात याबाबत शिऊर येथील ग्रामस्थासह
लोकप्रतिनिधिनी कित्येकदा निवेदन दिले आहे,
ग्रामसभेमध्ये देखील या विषयावर चर्चा
झाली मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या या प्रशासनाने कुठलीही
कार्यवाही न करता निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे.
बसस्थानक
कि असुविधांचे आगार
बससेवेचे तीनतेरा वाजले असतांनाच या स्थानकातील सुविधांची परिस्थिती वेगळी नाही.या बसस्थानकामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले
असून स्थानकाची दुर्दशा झाली आहे.गावाचे नामोल्लेख करणारे फलकदेखील
नाही तर छतावरील पत्रे जीर्ण झाल्याने त्यांनाही भगदाड पडले आहे. विविध पोस्टर्समुळे भिंतीही खराब झाल्या आहेत.स्थानकात पिण्याच्या
पाण्याची मोठी गंभीर समस्या असून प्रवासीवर्गाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध
नसल्याने पिण्याच्या पाण्याची टाकी केवळ देखावा म्हणून उभी आहे.बसस्थानक
परिसरातील शौचालयाची देखभालीअभावी दुरवस्था झाली असल्याने प्रवाश्यांची
कुचंबना होते. स्थानकातील उपहारगृह कित्येक दिवसांपासून बंदच आहे.बसस्थानकात
अस्वच्छता पसरली असून .मुलभूत सोयी सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे
मराठवड्यातील प्रवेशव्दार असलेल्या
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील बसस्थानकात एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या असून
या आम्ही शिऊर येथील लोकप्रतिनिधी, प्रवासी, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून
घेतल्या.
1
शिऊर येथून जाणाऱ्या जलदमार्गी बसेस
शिऊर येथे थांबल्या पाहिजे, तसेच काही वाहक प्रवासी वर्गाला अपमानास्पद वागणूक
देतात याची दखल परिवहन मंत्री महोदयांनी घ्यावी.
बबनराव जाधव {माजी सरपंच}
2
बसस्थानकातील खड्डे दुरुस्त करायला पाहिजे , शौचालय काम मार्गी
लागले पाहिजे, स्थानकातील जीर्ण पत्रे काढले पाहिजे , स्थानकात कार्यक्षम नियंत्रक हवा, हायमास्ट
दिव्याची उभारणी स्थानकात करण्यात यावी या बाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांच्यासोबत पत्रव्यवहार केला असून ठोस कार्यवाहीच्या अपेक्षेत आहोत.
- चंद्रशेखर
खांडगौरे {माजी सरपंच}
3
बाकी आगरासह वैजापूर आगाराच्या बसेस
देखील बसस्थानकात येत नाही, आम्ही लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारणार असून त्यात
समाधानकर्क उपाययोजना झाल्या नाही तर ठोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल. बसस्थानकात
बस न येताच महामार्गावरच थांबत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
वृद्ध,अपंग,महिलांना कसरत करावी लागते.
- गिरीश भावसार {माजी उपसरपंच}
4
तीस वर्षापूर्वी या
बसस्थानकाचे वैभव होते, आज त्याची दुरवस्था पाहून राज्यातील एस टी महामंडळाचा
कारभार कसा अधोगतीला जाणारा आहे हे निदर्शनास येते. इतक्या महागाचे भूखंड
बसस्थानकासाठी उपलब्ध असतांना सद्यस्थिती पाहून मन हेलावून जाते.
- बंडोपंत लाखे
{सेवानिवृत्त शिक्षक}
5
महामार्गालगत अर्धे गोलाकार बसस्थानक
करायला हवे, निकृष्ट कामामुळे कीतीही दुरुस्ती केली तरी एक वर्षभरात पुन्हा खड्डेच खड्डे.... फायदा फक्त ठेकेदाराचा.शिवाय
रोड पेक्षा बसस्थानकात येनार्या रस्त्याची उंची कमी असल्यामुळे वहाकांना
गाडी वळविने अवघड वाटत असावे.
गोकुळ आहेर {मा.संचालक – कृषी
उत्पन बाजार समिती}
6
शिवूर हि संतांची भूमी असल्या मुळे येथे
दर्शना /वारी साठी नेहमी च वारकरी संत येत असतात
बहुतांश बस गाड्या थांबत नसल्याने
त्यांची फार कुचंबणा होते,
बस गाड्या मध्ये येत नसल्याने वृद्धांना
नेमके स्थानकात बसावे कि महामार्गावर हे कळत नाही ,तसेच या ठिकाणी आयुर्वेदिक दवाखान्यात हि दुरून रुग्न येत असतात
त्यांना हि या ठिकाणी बस थांबत नसल्याने बंगला येथे उतरून मग दुसऱ्या
वाहनाने यावे लागते .
डॉ विजय महाजन { आयुर्वेदाचार्य}
7
गावातील व तालुक्यातील पुढाऱ्यांचा वचक नसल्याने शिऊर गाव
महामंडळाच्या अनेक सुविधांपासून वंचित राहत असून आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी
एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभारण्याची गरज आहे.
- निलेश
देशमुख {व्हा.चेअरमन, सोसायटी}
8
महाराष्ट्र राज्यातील
सर्वसामान्य लोकांना खेड्याकडून ते शहरा र्पर्यंत जोडणारी एस टी हि एक सामाजिक बांधीलकी निर्माण करणारी सेवा आहे सर्वाचे हक्काचे वाहन म्हणजे एस टी होय आपला प्रवास सुखाचा होण्याकरिता
सामान्य एस टी ने प्रवास करतो पण शिवूर येथील एस टी प्रवास नेहमी दुखाचा
झाला आहे महामंडळाची येथे जमीन व बसस्थानक आहे पण हे प्रवासिकारिता एक स्मारक
बनलेले आहे कारण एस टी हि बसस्थानक प्रवेश
करत नाही ती राज्य महामार्गावर म्हणजे
बसस्थानका बाहेर थाबते .आपला प्रवास सुखाचा होवो परंतु तो शिवूर च्या सामान्य
लोकांना दुखाचा
झाला .अनेक आपघात राज्य महामार्गावर
झाले आहेत बसस्थानक असून नाहक बळी
गलेले आहे .लांब पल्लाच्या एस टी बसेस
येथे थाबंत नाही ज्या जुन्या बसेस या मार्गावरील होत्या त्या दुसऱ्या मार्गावर
टाकण्यात आल्या आहे .शिवूरकर प्रवासी अनेक अडचणी तोंड देवून प्रवास करतो
.बसस्थानकात वेळापत्रक नाही अनेक असुविधा बस्थानाकात आहे .महामंडळाची येथे मोठी जागा
आहे या जागेत वैजापूर तालुक्याचे एस टी उपआगार होवू शकते याकडे
शासनाचे लक्ष द्यावे
महेंद्र देशमुख { शिक्षक}
9 शिऊर
बसस्थानकात बस याव्यात तसेच बसस्थानकातील सुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी
महामंडळाच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आलेले आहे मात्र फारसा बदल
झाला नसून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बसस्थानकात विद्युत दिव्यांची व्यवस्था
करण्यात आली आहे.
शिरीष चव्हाण {सामजिक
कार्यकर्ते}
10
राजकीय अनास्थेमुळे ही समस्या वाढतच असून स्वच्छतागृह, पाणी आदी
सुविधेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यायला पाहिजे. रास्तारोको आंदोलन केले पाहिजे
मात्र या प्रकाराबद्दल कुणालाच देणे घेणे नसून शिऊर गावाला ठोस नेतृत्वाचा अभाव
वाटतो.
सुधीर देशमुख {शिक्षक}
11
शिऊर गाव हे वैजापुर
तालुक्यात सर्वात मोठे असून आज परीवहन मंडाळाच्या मनमानी कारभारा मुळे शिऊर
वासीयांना दळनवळणासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या
बस ईथे थांबत नाही एवढेच नव्हे तर स्थानिक वैजापुर डेपोच्या बस सुध्दा
बसस्थानकाच्या आत न येताच परस्पर रोडवर थांबून निघुन जातात या मुळे शिऊर
बसस्थानक हे शोभेची वस्तू बनलेले आहे.तसेच रात्री सात वाजे नंतर औरंगाबाद कडून शिऊर ला
येण्यासाठी सुध्दा लांब पल्ल्याच्या बस
शिऊरकरांना बसमध्ये बसु देत नाही
वाहका सोबत बसमधे बसण्यासाठी व शिऊर येथे थांबण्यासाठी वाद
घालावा लागतो याची परीवहन मंडळाने दखल घेणे गरजेचे आहे
-डॉ.सोपान डघळे
12 बस नियंत्रक
बसस्थाकात उपस्थित असतांना देखील बस महामार्गावरूनच निघून जातात , मुलभूत सुविधा
मिळाव्यात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला असून अद्याप कुठलाही
साकाराताम्क प्रतिसाद मिळालेला नाही , स्थानकात अस्वच्छता असून दुर्गधीही पसरलेली
आहे.
डॉ.नवनाथ सोनवणे
13
बसस्थानकातील समस्या सोडविण्यासाठी तीव्र आंदोलन छेडने या एकच पर्याय
उरला असून ज्या बस स्थानकात येत नाही त्यांना शिऊर मार्गे जाऊ देऊ नये.
बाळू पवार {मा.ग्रा.पं.सदस्य}
14
शिऊर येथील बसस्थानकातील समस्या व
बससेवेच्या कारभाराला लगाम घालण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असून सर्वपक्षीय
लोकप्रतिनिधींनी एकत्र आल्यास प्रश्न निकाली निघेल.
- बाळा जाधव, ग्रामस्थ
15
शिऊर हे तालुक्यातील मोठे
गाव आहे. त्या दृष्टीने बस स्थानक नीटनेटके असणे आवश्यक आहे. परंतु
बसस्थानक अतिशय खड्डेमय झालेले आहे.पिण्यासाठी पानी नाही.स्वछतागृह
म्हणजे शोभेची वस्तू म्हणून उभी आहे.बस स्थानकात बसेस येत नाही.त्यामुळे
प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. परिवहन मंडळाने लवकर यात लक्ष घालून बस
स्थानक खडे मुक्त करावे तसेच सर्व बसेस बस स्थानक येतील असे नियोजन करावे.
रविंद्र सोनवणे {शिक्षक}
16
बस च्या बोर्डवर शिवुर
गावचा उल्लेख करावा, शिवुरच्या बस स्थानकावर बसचे वेळापत्रक असावे तसेच
सर्व डेपो च्या बस बस स्थानकात याव्या जेनेकरुण प्रवाश्यांचे हाल
होणार नाही
अरुण गोरे {प्रवासी}
17
या बाबतीत सर्व पक्षीय
कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते ,विद्यार्थी ,पालक ई.सर्व बस थांबवून त्या इथे थांबत नाही वा एंट्री देत नाही
म्हणून सर्वात पहिले शिऊर येथील बस व्यवस्थापक र यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानायला
हवे. व त्यानंतर सर्व येणाऱ्या बस चालक व वाहकांचे गुलाब फूल देवून आभार मानुया असे मला वाटते कदाचित् या नंतर तरी महामंडळा ला
सद्बुद्धि येईल.
महेश डोंगरे {प्राध्यापक}
18 बस
स्थानकातबस याव्यात व प्रवासी वर्गाला सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात एवढीच
माफक अपेक्षा.
गोरख तुपे {व्यावसायिक}
19
शिऊर बस स्थानक समस्यांचे
माहेरघर बनले आहे शिउर गाव हे
तीर्थक्षेत्र असून इथे येथे मोठी व्यापारपेठ आहे. स्थानकातील स्वच्छतागृह बंद असून
पाण्याची टाकी कायम रिकामीच आहे. बसस्थानकात
बस यावी या साठी अनेकदा वेळेस ग्राम सभेत ठराव घेण्यात आले आहे
मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही. आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत मांडून प्रश्न
निकाली काढावा.
प्रशांत झाल्टे {राजकीय पदधिकारी}
20
शिऊर येथे बस स्थानकात बस येत नसल्याने
शाळकरी मुलांना,वृद्घांना व सर्व प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागत आहे बस
मध्ये का येत नाही याचे मुख्य कारण आगार प्रमुखाने शिऊरवासीयांना सांगावेनाहीतर
त्यांचा एखादा कर्मचारी रोडवर उभा करुन जी बस मध्ये येणार नाही त्या संबंधीत
चालकावर गुन्हे दाखल करावे
नंदू त्रिभुवन {व्यावसायिक}
21
एकीकडे स्मार्ट सिटीची चर्चा आणि
दुसरीकडे मूलभूत सुविधांचा अभाव, तालुक्यातील
सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या व मोठ्या
प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करत असताना परिवहन मंडळाने बसस्थानक व त्यांच्या
थांब्यावर कानाडोळा केला आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी व
लोकप्रतिनिधींनी यावर महामंडळा सोबत चर्चाकरून लवकरात लवकर तोडगा काढावा
मयूर शिरोडे {विद्यार्थी}






