शिऊर ग्रामसभा ठरली वादळी
“तंटामुक्ती” वरून गोंधळ , विविध प्रश्न व समस्यांची सरबत्ती, सरपंच नितीन चुडीवाल यांची समन्वयाची भूमिका ठरली महत्त्वाची
शिऊर / सौरभ लाखे
दि १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिऊर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, शिऊर गावातील विविध प्रश्न-समस्या, शासकीय योजना यावर ग्रामस्थांनी आक्रमक होत जाब विचारला तर या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमितीच्या अध्यक्ष पदावरून थोडासा गोंधळ उडाला. अखेर सरपंच चुडीवाल यांच्या समन्वयाची भूमिका महत्वाची ठरली आणि पोलीस बंदोबस्तात ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांचे गुप्त मतदान घेत “तंटामुक्ती” समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली.
सरपंच नितीन चुडीवाल यांच्या अध्यक्षतेखाली शिऊर येथील ग्रामसचिवालय आवारात ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामस्थांसह महिलांनी आपल्या मागण्या ग्रामसभेत मांडल्या. तर सरपंच नितीन चुडीवाल यांनी शासकीय योजना व गावातील विकासकामांची माहिती दिली. स्वच्छ भारत मिशन च्या माध्यमातून शौचालय बांधकाम बेसलाईन बाबत सरपंच चुडीवाल यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच शिऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग , महिला व बालकल्याण व मागासवर्गीय निधीची माहिती दिली. “आपले सरकार” मधून विविध दाखले ऑनलाईन काढण्याबाबत चुडीवाल यांनी मार्गदर्शन केले.
वृक्षारोपण, वैयक्तिक शौचालय अनुदान आणि प्रलंबित दाखल प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. लक्ष्मण धनेश्वर यांनी याबाबत आकडेवारीनुसार प्रस्तावित आणि शिल्लक शौचालयच्या बाबत विचारणा केली. जि.प.शाळेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दरमहा तपासणी करावी अशी मागणी चंद्रशेखर देशमुख यांनी केली. गाव आणेवारी बाबत शेतकऱ्यांचा समावेश असलेली आणेवारी समिती स्थापन करा आणि तालुक्यालादुष्काळी घोषित करण्याची मागणी केली. गावातील चार अंगणवाड्या या समाज मंदिरात भरतात त्यापैकी अनेक अंगणवाडीमध्ये अद्याप स्वच्छतागृहेच नसल्याचे सांगून नवीन चार अंगणवाड्या आणि शौचालय उपलब्ध करून देण्या बाबत अंगणवाडी सेविका शालिनी पगारे यांनी लक्ष वेधले. प्रकाश सोनवणे यांनी गावातील वाटप केलेल्या भोगवट्या विषयी सरकारी जमीन शिलकी बाबत विचारणा करत धारेवर धरले. शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता पहिले ते सातवी व आठवी ते दहावी शाळा एकत्रित करण्याची मागणी नितीन भावसार यांनी केली. शिऊर येथील शैक्षणिक गुणवत्ता तपासणी साठी नियंत्रण समिती स्थापन करण्याची व वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी सुभाषचंद्र जाधव यांनी केली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची मागणी बाबासाहेब पगारे यांनी केली.
ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांना घेतले फैलावर
शिऊर येथील ग्रामसभेत विविध प्रश्न व समस्यांची सरबत्ती सुरु असतांनाच शिऊर येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यावर ग्रामस्थ नाराज असल्याचे विविध बाबीवरून दिसून आले. लक्ष्मण धनेश्वर यांनी विविध प्रश्न उपस्थित केले त्यात विविध योजनांची आकडेवारी ग्रामविकास अधिकारी जी.आर गायकवाड यांना विचारली असता त्यांनी वेळ मारून नेली तर चंद्रशेखर देशमुख यांनी ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांना प्रशासक म्हणून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्रशाला या सह विविध ठिकाणी भेटी देऊन अहवाल तयार करतात का असा प्रश्न करत गायकवाड यांना निरुत्तर केले. तर ग्रामसभेत विषय पत्रिकेत असलेल्या विषयावर ग्रामविकास अधिकारी यांनी तयारी करून येण्याची गरज होती मात्र त्यांनी कुठलीही तयारी केली नसल्याचे ग्रामस्थ म्हणाले. दरवेळी प्रमाणे या ग्रामसभेला ग्रामपंचायतीने माईकची व्यवस्था न केल्याने उपस्थित ग्रामस्थाना ग्रामसेवकाने बोलणे ऐकू येत नव्हते ग्रामसभेत ध्वनीक्षेपक लावले नसल्याच्या सूर आळवत “आम्ही वर्गणी जमा करतो मात्र ध्वनीक्षेपक लाऊन ग्रामसभा घ्या असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याबरोबर सरपंच नितीन चुडीवाल यांनी ध्वनिक्षेपक बोलावून घेतले.
अधिकाऱ्यांची ग्रामसभेला दांडी
गाव विकासाच्या हेतूने गावात कार्यरत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी या ग्रामसभेला आवश्यक माहितीसह उपस्थित राहणे गरजेचे होते मात्र काही अपवाद वगळता बाकी अधिकाऱ्यांनी या ग्रामसभेला दांडी मारली पशु वैद्यकीय अधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक, निवडक रेशन दुकानदार, तलाठी, अंगणवाडी सेविका वगळता या ग्रामसभेलाही प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, कृषीविभागाचे अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी दांडी मारल्याने ग्रामसभेचा अवमान म्हणून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
दहा वर्षात प्रथमच "तंटामुक्तीच्या" अध्यक्षपदासाठी मतदान
दि १५ ऑगस्ट २०१७ रोजी पासून गावातील तंटे , अंतर्गत वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ न देता आपसात समजूत घालून गावातच वाद मिटविण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून "महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती" स्थापन करण्यात येते. गेल्या दहा वर्षांपासून शिऊर गावात काहीसा विरोध वगळता या समितीचे अध्यक्षपद बिनविरोध व्हायचे. सरपंच नितीन चुडीवाल यांनी ही समिती गठीत करण्यात यावी असा प्रस्ताव सरपंच नितीन चुडीवाल यांनी मांडताच एकच गोंधळ उडाला अध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे घेण्यात आली यात भास्कर जाधव, बबन जाधव व नंदू पगार हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते , या समितीच्या अध्यक्षपद निवडीसाठी ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थांचे मतदान घेण्याचा मार्ग सरपंच नितीन चुडीवाल यांनी सुचविला , ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी काहीकाळासाठी सभा तहकूब झाल्याचे सांगून मतदान प्रक्रियेची तयारी केली. अगदी कमी वेळात संगणीकृत मतपत्रिका तयार करण्यात येऊन प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले , तिरंगी झालेल्या या लढतीत ३९७ ग्रामस्थापैकी १७९ ग्रामस्थानी तंटामुक्तीच्या अध्यक्ष पदासाठी मतदान केले , यात १४ मतदान बाद झाले तर नंदू पगार यांना ११, भास्कर जाधव यांना ४८ तर १०८ मते घेत माजी सरपंच व विविध सेवा संस्थेचे चेअरमन बबनराव जाधव विजयी झाले. मतदान प्रकिया पार पाडण्यासाठी जी आर गायकवाड, चंद्रशेखर देशमुख, विशाल जाधव, गणेश शिरोडे, योगेश क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिऊर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान शिऊर गावात सलोख्याचे वातावरण असून शिऊरला तंटामुक्तीचा पुरस्कार प्राप्त करून देण्याचा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष बबनराव जाधव यांनी बोलतांना व्यक्त केला.
शिऊर येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण
शिऊर / प्रतिनिधी
शिऊर येथे स्वातंत्र्य दिना निमित्ताने विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. शिऊर ग्रामपंचायतमध्ये सरपंच नितीन चुडीवाल, संत बहिणाबाई महाविद्यालयात संस्थेचे संचालक धन्नालाल चुडीवाल, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ समीर पटेल, पोलीस ठाणे येथे स पो नि धनंजय फराटे, जि.प प्रशालेत मुख्याध्यापक बी के घुले, विविध कार्यकारी सेवा संस्थेत चेअरमन राजेंद्र जाधव, बबनराव जाधव, संत शंकरस्वामी पतसंस्थेत वाल्मीक भावसार यांनी ध्वजारोहन केले. दरम्यान प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती तर देशभक्तीपर गीतेही सादर केली. जि.प प्रशालेत माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही च्या नियंत्रण कक्षाचे उदघाटन गुणवंत विद्यार्थीनीच्या हस्ते करण्यात आले . या वेळी राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .