चोरांच्या धास्तीने ग्रामस्थांचे "जागते रहो"
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
शिऊर / सौरभ लाखे
         वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या चोर , दरोडेखोरांच्या अफवेचे पेव फुटले असून या धास्तीने शिऊर परिसरातील नागरिक रात्रभर जागरण करत आहे, दरम्यान सोशल मीडियावर देखील अफवा पसरविल्या जात आहेत.
      गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील खंडाळा परिसरात चोरीचे प्रकार घडले होते , तेव्हापासून तालुक्यात सोशलमीडियाच्या काही  व्हाट्सअप गृपवर बाहेर राज्यातील टोळींचे फोटो व्हायरल केले जात असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शिऊर व वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरादिवसांपासून एकही चोरीचा गुन्हा दाखल
 नसून चोरांच्या नावावर अनेक गैरप्रकार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  मागील आठवड्यात जानेफळ येथे भिक्षा मागणाऱ्या दोघांना नागरिकांनी चोर समजून पोलिसांच्या हवाली केले होते तर शिऊर येथे फिरणाऱ्या  एक परप्रांतीय स्त्री ला देखील शिऊर पोलिसांनी ताब्यात घेतले होते, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर ती स्त्री मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.
शिऊर पोलिसांची रात्रभर गस्त
शिऊर परिसरात चोरांची अफवा सुरु असून नागरिक रात्र जागून काढत आहे, शिऊर पोलीस देखील हद्दीत रात्रभर गस्त घालत आहेत.


अफवांवर विश्वास ठेवू नका -
गेल्या 10-15 दिवसांपासून सोशल मिडीयावर वैजापूर तालुक्यात बरेच गावात 'चोर आले, दरोडेखोर आले, चोर दिसले..' असे मेसेज काही खोट्या फोटोंसह अनेक ग्रामीण भागातील ग्रुप वर व्हायरल झालेत..
बरेच गावात त्यामुळे विनाकारण दहशत निर्माण होत आहे आणि गोंधळ वाढतो आहे..पोलीस पोहचल्यावर ह्या सर्व अफवा असल्याची खात्री झाली आहे. तसेच चोरीच्या नावाखाली इतर गैरप्रकार करण्यासाठी काही लोक जाणूनबूजून असे संदेश पसरवत आहेत..
आपणास आवाहन करण्यात येत आहे की सोशल मिडीयावरच्या चुकीच्या संदेशाना बळी पडू नका..अफवांवर विश्वास ठेवू नका स्वतः पसरवू नका. काही शंका असेल तर पोलीस ठाण्यात फोन करून माहिती द्यावी.
तसेच जे समाजकंटक विनाकारण असे खोटे संदेश पसरवतील त्यांच्या वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- सुनिल लांजेवार
 उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर उपविभाग






 
Top