कायद्याचा पितामह आणि देशाचा धर्मग्रंथ म्हणजे भारताचे संविधान :  डीवायएसपी लांजेवार

संविधान दिनानिमित्त शिऊर येथे रॅली आणि व्याख्यानाचे आयोजन

शिऊर । प्रतिनिधी
कुठलाही कायदा अडचणींचा ठरला किंवा समाज आणि देशहिताला अडसर ठरू लागला की त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संविधान करते म्हणून कायद्याचा पितामह म्हणजे या देशाचे संविधान आहे. देशात अनेक जाती, धर्म, पंथ किंवा समूह असून प्रत्येकाचे धर्मग्रंथ वेगळे असतीलही परंतु या भारत देशाचा सर्वोत्तम धर्मग्रंथ केवळ या देशाचे संविधानच असल्याचे प्रतिपादन वैजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी केले. ते शिऊर येथील भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहार मंडळाच्या वतीने दि २६ नोव्हेंबर रोजी आयोजित संविधान सन्मान दिनात बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण धनेश्वर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयातील जेष्ठ वकील ऍड. सुभाष गायकवाड, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई खिंवसरा, बार्टी संस्थेचे जिल्हा समतादूत रवी कळसईदकर,शिऊरचे माजी जि प सदस्य सुनील पैठणपगारे, जि प सदस्या सपनाताई पवार, माजी पं.स. उपसभापती सुभाष जाधव, प्रभारी एपीआय वाय. एस. कदम, उपसरपंच जाकेर सय्यद, त.मु. अध्यक्ष बबनराव जाधव, माजी उपसरपंच नंदू जाधव, शिरीष चव्हाण, यशवंतराव पडवळ, विलास म्हस्के, जीवन पठारे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रतिमेचे पूजन व त्रिशरण पंचशीलने झाली. त्यानंतर २६/११ तील शाहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन होऊन प्रमुख व्याख्यात्यांची व्यख्याने झाली. यावेळी डीवायएसपी लांजेवार यांनी विविध मुद्द्यांना हात घालत सोप्या भाषेत संविधानाचे महत्व विशद केले. ते म्हणाले की, भारतीय संविधान म्हणजे बाबासाहेबांचे समस्त देशवासीयांसाठी केलेले वैयक्तिक चिंतन आहे.अनेकांना बाबासाहेब म्हणजे एका विशिष्ठ जाती धर्माचे वाटतात आणि त्याच चौकटीतून त्यांना पाहतात मात्र, ज्यावेळी या देशाची सत्तासुत्रे एका धर्माच्या ताब्यात होती तेव्हा बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समता, न्याय, बंधुता प्रस्थापित करून देश एकसंध केला. सुख दुःखाची तमा न बाळगता आयुष्यभर बाबासाहेब देशहित, राष्ट्रहित आणि समाजहितासाठी झटले असल्याचे लांजेवार म्हणाले. एड.सुभाष गायकवाड यांनी ज्या संविधानात धर्मनिरपेता दिली आशा संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगितले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा महिलांच्या अधिकार आणि तरतुदींविषयी म्हणाल्या की, पुरुषप्रधान संस्कृतीने देशाचे वाटोळे केले, म्हणून आता सत्ता खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती द्या. संसार जसा चिकाटीने महिला हाकतात त्याच पद्धतीने देशाची सत्ता सांभाळतील, मात्र इथे महिला ग्राम पंचायत सदस्य जरी असली तरी तिला तेथे जाण्यापासून रोखले जाते, दोघांच्या साथीने घराचा आणि पदाचा गाडा हाकला गेला पाहिजे अस त्या म्हणाल्या. दरम्यान, सकाळी ९ वाजता गावातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती. एड. सुभाष गायकवाड यांच्याकडून विहारास संविधान प्रत भेट देण्यात आली.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या कांताबाई पगारे, विवेक जाधव, बाळा जाधव, सुनील सुरासे, पोलीस कर्मचारी मनोज औटे, अमोल कांबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण धनेश्वर, उपाध्यक्ष अशोक पगारे, भागीनाथ पगारे, सचिव विलास पगारे, सिद्धार्थ पगारे, कारभारी धनेश्वर, संजय पगारे, चेतन दिवेकर, गौतम बी पगारे, राजाभाऊ पगारे, दीपक धनेश्वर, महिला मंडळाच्या अध्यक्षा शालिनी पगारे, उपाध्यक्षा छाया पगारे, जया पगारे, सचिव सुनीता धनेश्वर, कोषाध्यक्ष सोनाली बोर्डे, निर्मला पगारे, येलनबाई पगारे, भागूबाई धनेश्वर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.


 
Top