ग्रामपंचायत सदस्य व सदस्य पतींची दादागिरी, विरोधात बातमी लावली म्हणून पत्रकारांशी अरेरावी करत शिवीगाळ

शिऊर ।  घरकुलाच्या बांधकामावर दोन ग्रामपंचायत सदस्य पतींनी जेसीबी फिरवल्याची बातमी एका दैनिकात प्रसिद्ध झाल्याचा राग धरून शिऊर येथील दोन सदस्य पतींनी बातमी का लावली म्हणून पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली. हा प्रकार दि ०१ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष ग्रामसभा आटोपल्यावर घडला. याबाबत सविस्तर असे की, दि २४ ऑक्टोबर रोजी ' शिऊरला दोन सदस्य पतींचा मनमानी कारभार', 'घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामावर फिरवले जेसीबी' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती. सदर बातमीसाठी लाभार्थी शामराव दिवेकर यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी औरंगाबाद आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची प्रत पत्रकार संजय पगारे यांच्याकडे देऊन या संदर्भात न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्या निवेदनाच्या आधारे पगारे यांनी बातमी प्रसिद्ध देखील झाली. मात्र, बातमीत नामोल्लेख असलेल्या सदस्यपती बाळू पवार आणि अशोक चव्हाण यांचा जळफळाट झाल्याने ग्रामसभेत ग्रा.प.सदस्या मंगल पवार यांच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित करत वाद घालण्यात आला. त्यास अण्णाभाऊ साठे स्मारक या संवेदनशील विषयास जोडण्यात येऊन सामाजिक वातावरण बिघडवण्याच्या दृष्टीने मुद्दा मांडण्यात आला. यावेळी सरपंच नितीन चुडीवाल यांनी हा विषय आजच्या ग्रामसभेतला नाही असे म्हणून विषय टाळण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या विरुद्ध खोटी बातमी का छापली म्हणून ग्रामसभेत तिघांनीही गोंधळ घातला. गोंधळ होत असल्याचे पाहून ग्रामसभा संपवण्यात आल्यानंतर उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतरही सदस्य मंगल पवार आणि सदस्यपती बाळू पवार व अशोक चव्हाण यांनी पत्रकार संजय पगारे याना अर्वाच्य शब्दात बोलून बेछूट आरोप करायला सुरुवात केली. पत्रकार संजय पगारे यांनी सदर बातमी ही आलेल्या निवेदनाच्या आधारे लावण्यात आली असून काय तक्रार असेल तर कार्यालयाकडे करा किंवा तुम्हाला बतमीबद्दल काय खुलासा करायचा तो प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करा, तुमचीही बाजू बातमीतून मांडू असे सांगितले. मात्र, ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या सदस्य आणि सदस्य पतींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी पत्रकारावर अशोभनीय व अपमानास्पद वक्तव्य केल्याने अखेर पत्रकार पगारे यांनी शिऊर पोलीस ठाणे गाठून सदस्य पती बाळू पवार, अशोक चव्हाण आणि सदस्या मंगल पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत दादागिरी करून शिवीगाळ करणाऱ्या सदस्य व सदस्यपतीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
Top