शिऊर सोसायटीचे चेअरमन राजेंद्र जाधव यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल
१३ संचालकापैकी ११ संचालकांच्या स्वाक्षरीने अविश्वास प्रस्ताव दाखल
शिऊर / सौरभ लाखे
              शिऊर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन राजेंद्र जाधव यांच्यावर सोसायटीच्या संचालकांनी अखेर अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून संस्थेच्या १३ संचालकांपैकी तब्बल ११ संचालकांच्या स्वाक्षरीने वैजापूर येथील उपनिबंधक कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
          सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिऊर येथील विविध कार्यकारी सेवा संस्था {सोसायटी} च्या चेअरमनपदावरून गेल्या तीन महिन्यापासून शितयुद्ध सुरु होते  ठरल्याप्रमाणे चेअरमन राजेंद्र जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने संस्थेच्या संचालकात अंतर्गत सुंदोपसुंदी चालू होती दि १३ रोजी  व्हा.चेअरमन निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या संचालकांची बैठक घेण्यात आली. यात   चेअरमन राजेंद्र जाधव यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला.
चेअरमन राजेंद्र जाधव हे संचालक मंडळास विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कार्यभार करतात. संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा न घेणे, संचालक मंडळाची मासिक बैठक न घेणे, सभासदांचे हित न जोपासणे तसेच कर्जमाफी बाबत गांभीर्याने काम न करणे असा ठपका चेअरमन राजेंद्र जाधव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हा ठराव महावीर चुडीवाल यांनी मांडला तर या ठरावाला पंढरीनाथ ठेंगडे यांनी अनुमोदन दिले.
संचालक मंडळाचा ठराव संमत झाल्यावर ११ संचालकांनी वैजापूर येथील उपनिबंधक कार्यालय येथे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. दरम्यान या प्रस्तावावर निलेश देशमुख, महावीर चुडीवाल, शिवाजी आढाव, नंदू वरपे, अण्णासाहेब पगारे, पंढरीनाथ ठेंगडे, सुनील शिरोडे, पारस बागुल, नानासाहेब साळुंके, आशाबाई जाधव, भीमाबाई घोडके या ११ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                  संस्थेच्या एकूण १३ जागांसाठी दि १३ मार्च २०१६ रोजी मतदान प्रकिया घेण्यात आली होती, या निवडणुकीत शेतकरी व लोकशाही या दोन गटाने आपले एकूण २६ उमेदवार उभे केले होते तर तीन अपक्षांनी या निवडणुकीत आपले नशीब अजमावले होते. मतदारांनी आपला कौल देत शिवशाही गटाला ८ तर शेतकरी गटाला ५ जागा मिळाल्या. बहुमत असल्याने शिवशाही या गटाने चेअरमनपदावर आपली दावेदारी सिद्ध करत चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी तयारी सुरु केली, या पदावर कोणाला बसवावं या बाबत अनेक खलबते झाली, अखेर स्थानिक लोकप्रतिनिधीनी मध्यस्थी करत नियुक्त झालेल्या संचालकांना या पदाची संधी मिळावी असे ठरविण्यात आले. दरवर्षी या दोन्ही पदावर संचालकांना संधी देण्यात येईल असे ठरल्यावर राजेंद्र जाधव यांची चेअरमनपदी तर निलेश देशमुख यांची व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र एक वर्ष उलटूनही चेअरमन राजेंद्र जाधव यांनी राजीनामा न दिल्याने या पदासाठी इच्छुक असणाऱ्या संचालकांची सुंदोपसुंदी चालू होती अखेर याचे पर्यवसान अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यापर्यत झाल्याने शिऊरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 
Top