"ढेकू"चे पाणी पिण्यासाठीच आरक्षित करावे 
  सरपंच नितीन चुडीवाल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
शिऊर / सौरभ लाखे
शिऊर गावासह परिसरातील खेड्यांची तहान भागविणाऱ्या ढेकू मध्यम
प्रकल्पातील पाणी भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता सिंचनासाठी न सोडता
प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीच आरक्षित ठेवावे अशी मागणी शिऊरचे सरपंच नितीन चुडीवाल हे जिल्हाधिकार्यांना करणार आहे. शिऊर गावासह परिसरातील खेड्यांसाठी जलसंजीवनी असलेले भटाणा धरण ( ढेकू मध्यम प्रकल्प) यंदा समाधानकारक न भरल्याने आगामी काळात जलसंकट ओढवणार आहे या धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडता या धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे , या मागणीचे निवेदन शिऊर गावचे सरपंच नितीन चुडीवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार  आहे. 
कायम अवर्षणग्रस्त असलेल्या वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षा असून दोन महिन्या नंतर देखील मोठा पाऊस झाला नसल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिऊर परिसरात अधून मधून होत असलेल्या भुरभुरीतून शेतातील पिकं चांगली तरली आहेत. मात्र, मुसळधार पावसाअभावी बारा गावांची तहान भागवणाऱ्या ढेकू(भटाना) मध्यम प्रकल्पात केवळ २८ टक्के जलसाठा असून पाच गावांची तहान भागवणाऱ्या कोल्ही मध्यम प्रकल्पात निव्वळ १९ टक्केच साठा उपलब्ध असल्याने भविष्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे मुसळधार पावसाने अनेक मोठी धरणे तुडुंब भरले जात असून ओला दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना शिऊर व परिसरात जून पासून मोठा पाऊस अद्याप पर्यंत झालाच नसल्याने टंचाईसदृश स्थिती आहे. साधारण व समाधानकारक झालेल्या पावसाने पिकांना चांगले जीवदान मिळाले असले तरी जोरदार पावसाअभावी ओढे नाले तसेच पाझर तलाव अजूनही कोरडेच आहेत. महिनाभरात थोडा बहुत भिजपाऊस झाल्याने अजूनही मोठ्या पावसाची नागरिकांना ओढ लागून आहे. बारा गावांची तहान भागवणाऱ्या भटाना मध्यम प्रकल्पात मृत साठ्यासह २८ टक्के जलसाठा आहे. तर पाच गावांची तहान भागवणाऱ्या कोल्ही मध्यम प्रकल्पात १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. महिनाभरात परतीचा पाऊस चांगला बरसला तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल नसता जानेवारी महिन्या पर्यंत पाणीप्रश्न तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
वैजापूर तालुक्यातील सर्वधिक लोकसंख्येचे गाव असणाऱ्या शिऊर गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शिऊर गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी या प्रकल्पात पेयजल योजनेच्या  माध्यमातून दोन विहिरी खोदण्यात आलेल्या ग्रा ग्रामपंचायतीच्या कार्यतत्परतेमुळे शिऊर गावात नवीन नळजोडणी करण्यात येऊन गेल्या दोन वर्षापासून विभागवार सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे .
भटाना मध्यम प्रकल्पातील गाळ सिंचनास मारक

शिऊरसह परिसरातील बारा गावांची तहान भागवणारे भटाना मध्यम प्रकल्पात २८ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. पैकी मृत साठा ५ टक्के आहे परंतु मृतसाठ्याची जागा सात टक्के गाळाने घेतली असल्याने साठवण क्षमतेचा प्रश्न उभा ठाकला आहे. पावसाळ्याच्या तीन महिन्या नंतरही कमी जलसाठ्यामुळे जानेवारी महिन्या पर्यंत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातील मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ जलसाठ्यास मारक ठरत आहे. पाटबंधारे विभागाकडून सात टक्के गाळ असल्याचे बोलले जात असले तरी ठराविक व निश्चित आकडेवारी पाटबंधारे विभागाकडे देखील उपलब्ध नसल्याने एकूण जलसाठ्याचा निश्चित अंदाज बांधणे अशक्य आहे. परिणामी शिल्लक जलसाठा किती दिवस टिकेल हा प्रश्न कायम उभा राहिलेला आहे.

अवैध्य  विद्युत मोटारींना आवर घालणे गरजेचे

कोल्ही आणि ढेकू प्रकल्पात अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपांची संख्या मोठी आहे. परिसरातील अनेक शेतकरी पिकांसाठी हिवाळ्यात भरमसाठ पाणी उपसा करतात त्यातून पाणी पातळी वेगाने खालावते. परिणामी या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना टंचाईच्या झळा वर्षानुवर्षांपासून सोसाव्या लागत आहे. त्यामुळे अशा अवैध उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावर महसुली अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
जलसंजीवनी ठरला ढेकू मध्यम प्रकल्प
वैजापूर तालुक्यातील शिऊर, भटाणा, मनेगाव, साकेगाव, रामवाडी, पोखरी, देवगाव, भोकरगाव या गावांना पाणीपुरवठ्यासह या प्रकल्पाने तब्बल ५० गावांची तहान भागविली होती.

ढेकुतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे या बाबत अभियंत्याशी बोललो असून ऑक्टोबरच्या शेवटपर्यत पाणीपातळी किती टक्के असेल यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले आहे, ऑक्टोबर एंड ला शिऊर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना भेटून याबाबत निवेदन देणार असून धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवावे अशी मागणी करणार असल्याचे सरपंच नितीन चुडीवाल यांनी सांगितले.

 
Top