शिऊर येथे महावितरणकडून अतिरिक्त भारनियमन, वारंवार वीज गुल होत असल्याने ग्रामस्थ हैराण

शिऊर /संजय पगारे
दोन महिन्या पासून राज्यात शहरासह ग्रामीण भागात भारनियमन सुरू झाले आहे. विजेचे भारनियमनाचे काटेकोरपणे पालन केले जावे असे शासनाचे कडक आदेश असताना शिऊर येथे भारनियमना शिवाय अतिरिक्त आणि वारंवार वीज पुरवठा खंडित ठेवण्याची किमया शिऊर व वैजापूर महावितरण कार्यालयाकडून केली जात आहे. दुसरीकडे मात्र, महावितरणच्या या मनमानी कारभाराला जनता चांगलीच त्रस्त झाली आहे.

शिऊर येथील महावितरण सबस्टेशन मधून शिऊरसह  लोणी खुर्द, वाकला, कोल्ही, कोरडगाव आदी पंधरा ते वीस गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र, पंधरा वर्षांनंतर विजेची वाढती मागणी, जीर्ण झालेल्या वीज तारा, पोल, वाढीव क्षमतेची यंत्रणा उभी राहणे आवश्यक असताना जुनाट आणि कमी दाबाच्या सबस्टेशन मधून विजपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात ९ आणि शहरी भागात ६ तासांचे भारनियमन करण्यात आले असले तरी स्थानिक अधिकाऱ्यांच्या निष्काळजी आणि मनमानी कारभाराचा सर्वसामान्य जनतेला चांगलाच फटका बसतो आहे. ९ तासाऐवजी तब्बल १४ तासा पर्यंत शिऊर परिसरात भारनियमन केले जात असल्याने व्यावसायिक, घरघुती ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याविषयी अधिक माहिती घेण्या करीत शिऊरच्या सहायक अभियंत्यांना मोबाईलहून वारंवार संपर्क साधून देखील त्यांनी कॉल उचलून प्रश्न ऐकून घेण्याची सौजन्य दाखवले नाही.

पाच वर्षांपासून विजेचा प्रश्न मिटेना

शिऊर हे तालुक्यातील मोठे गाव आहे. येथूनच परिसरातील पंधरा गावांना वीज पुरवठा होतो. पाच वर्षांपासून फिडरच्या समस्या, कर्मचाऱ्यांचा अभाव आदी समस्या जैसे थे असल्याने विजेच्या लपंडावाला दररोज सामोरे जावे लागते. दर पंधरा ते वीस मिनिटा नंतर पाच ते दहा मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होत असतो. या प्रकारामुळे शिऊरकर पुरते वैतागले आहेत. या बाबत वरिष्ठ स्तरावरून समस्या सोडवण्यासाठी कुठलेच पाऊल उचलले जात नसल्याने ही वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.ही बाब वरिष्ठ पर्यंत जाऊ नये याची खबरदारी देखील शिऊर कार्यालय घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारनियमनाच्या बाबतीत आम्ही काही करू शकत नाही, जे वरीष्ठ स्तरातून आम्हाला आदेश येतात त्याचे आम्हाला पालन करावे लागते. उत्पादन कमी झाल्याने भारनियमन जास्त करावे लागते. राहिला प्रश्न वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा तर त्या विषयी कनिष्ठ अभियंत्यांशी बोलतो.
आर.आर. केंद्रे
सहायक अभियंता, उपविभाग वैजापूर
 
Top