शिऊर / सौरभ लाखे

शिऊर हे वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असून सतरा सदस्यीय असणाऱ्या या ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती अपेक्षित आहे मात्र एवढ्या मोठ्या गावाचा कारभार ग्रामसेवक बघत असल्याने या ग्रामसेवकाची इतरत्र बदली करून शिऊर येथे ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा ठराव शिऊर येथील ग्रामसभेत पारित करण्यात आला. या शिवाय ग्रामस्थांनी विविध ठराव मांडत कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामसभेत केल्या.

दि २ ऑक्टोबर रोजी शिऊर येथील स्व. प्रमोद महाजन सभागृहात सरपंच नितीन चुडीवाल यांच्या अध्यक्षतेखाली  ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत विविध विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच नागरिकांनी काही प्रश्नांची सरबत्ती करत ग्रामसेवकाची बोलती बंद केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूरशास्री व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन ग्रामसभेला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान गाव विकासाविषयी ग्रामसभा महत्वाची असल्याने काही ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला, अनुपस्थित सदस्यांना नोटीस देणार असल्याचे सरपंच नितीन चुडीवाल यांनी सांगितले.

ग्रामसेवक जी आर गायकवाड यांनी मागील सभा वृत्तांताचे वाचन केले मात्र मागील ग्रामसभेत घेतलेले ठराव या इतिवृत्तांतात कां घेतले नाही असा सवाल करत ग्रामस्थांनी गायकवाड यांना धारेवर धरले. सक्तीची केलेली दिव्यांगसाठी ग्रामसभा व महिलांची विशेष ग्रामसभा शिऊर ग्रामपंचायतीने घेतलीच नसल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

वैयक्तिक शौचालय अनुदान व वापर या विषयावर या ग्रामसभेत चांगलीच चर्चा झडली. शिऊर गावात एकूण १८२४ शौचालयाचे उदिष्ट ठेवले असून या पैकी १३४९ शौचालय पूर्ण झाले असून अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित ४७५ पैकी ३३५ शौचालयाचे प्रस्ताव वैजापूर पंचायत समितीकडे दाखल असून निधीअभावी अनुदानास विलंब होत असल्याचे सरपंच नितीन चुडीवाल यांनी सांगितले. काही ग्रामस्थांनी शौचालय बांधकाम करून शासकीय अनुदान अनुदान घेतलेले असतांनासुद्धा ते उघड्यावर शौचाला जात असल्याची मुद्दा बाळासाहेब जाधव यांनी मांडल्यावर उघड्यावर जाणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सरपंच चुडीवाल यांनी दिला, तर शौचालय वापर करत नसलेल्या कुटुंबाचे रेशन बंद करण्याची मागणी माजी उपसरपंच गिरीश भावसार यांनी केली. शौचालय असून त्याचा वापर न करणाऱ्या व्यक्तींची माहिती त्याच्या शेजाऱ्याकडून घेण्यात येणार असून माहिती सांगणाऱ्या शेजाऱ्याला बक्षीस दिले जाणार आहे. तसेच गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचे सरपंच या वेळी म्हणाले. शिऊर गावातील बंद असलेले सार्वजनिक शौचालय चालू करण्याची मागणी बाबासाहेब पगारे यांनी केली तर रहिवासी परिसरात उघड्यावर बसणाऱ्यावर कठोर कार्यवाहीचा ठराव बाळा जाधव यांनी मांडला.

महिलांसाठी १०  टक्के निधी खर्च करण्यात येणार असून अंगणवाडी मध्ये तसेच  महिलासाठी गावात  सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात येणार आहे. तर १५ टक्के निधी मागासवर्गीय प्रभागात खर्च करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत गर्भलिंग निदान होऊ देणार नसल्याचा ठराव पारित करण्यात आला तसेच गर्भलिंग निदान करणार नसल्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली.  गर्भलिंगनिदान होऊ नये यासाठीआरोग्य विभागाने जनजागृती करून महिला मेळावे आयोजितकरण्याची व शालेय व महविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीची निबंध स्पर्धा घ्यावी अशी सूचना लक्ष्मण धनेश्वर यांनी केली.तसेच शिऊर ग्रामपंचायतीमध्ये नातेवाईकांचा हस्तक्षेप थांबावा अशी मागणी देखील धनेश्वर यांनी केली.  शिऊर गावातून एकूण ७३ दिव्यांगाची  नोंदणी झाली असून  त्यांना प्रत्येकी ५००० रुपये थेट बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे पहिल्या टप्यात २४ लाभार्थी निवडले असल्याचे ग्रामसेवक जी आर गायकवाड यांनी सांगिलते. रोजगार सेवक जनतेचे काम अडवित असून काम करण्यासाठी  चिरीमिरी घेत असल्याबाबत प्रशांत झाल्टे यांनी तक्रार केली. खटकळी नाला संत शंकरस्वामी महाराज मंदिरामागील तलावात वळविण्यात यावा तसेच गावात नियमित धूरफवारणी करावी असा ठराव सुशील देशमुख यांनी मांडला.गाळमुक्त शिवार  योजनेतून पाझर तलावातील गाळ काढाण्याची मागणी प्रमोद गुळे यांनी केली. २५ १५  योजनेतून भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहाराला निधीची मागणी लक्ष्मण धनेश्वर व अशोक पगारे यांनी केली. शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती एकाच फलकावर देण्यात यावी अशी मागणी मयूर शिरोडे यांनी केली. शिऊर येथे खाजगी जागेवर कचरा टाकण्यात येत असून ग्रामपंचायतीने कचरा डेपो उभारावा अशी मागणी प्रा. चंद्रशेखर देशमुख यांनी केली, शिऊर येथील बसस्थाकावर शिऊर गावाच्या लोकसंख्येचा फलक लावण्यात यावा असा ठराव महेंद्र देशमुख व शिरीष चव्हाण यांनी मांडला. शिऊर गावाला अध्यात्मिक ऐतिहासिक व पौराणिक महत्व असून या गावाची महती विशद करणारा फलक गावात लावावा असा ठराव प्रकाश जाधव यांनी मांडला. शेतकऱ्यांचे संपूर्ण  कर्ज माफ करून कपाशीला ७००० तर मका पिकास १५०० रुपये हमीभाव द्यावा, अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष बबनराव जाधव यांनी केली. शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्याची आग्रही मागणी माजी जि प सदस्य सुनील पैठणपगारे यांनी केली.

चौकट :

विकासाची ब्लू प्रिंट असावी : डॉ. खतगावकर

गावाच्या सर्वांगीण विकासाच्याहेतूने गाव विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी असे आवाहन जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांनी केले. या ग्रामसभेसाठी संपर्क आधीकाई म्हणून ते उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले कि,मलेरिया डेंग्यू व चिकणगुण्या या आजारापासून दूर राहायचे असेल तर आठवड्यातून एक दिवस पाण्याचे साठे कोरडे ठेऊन एक कोरडादिवस पाळावा. विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती शिक्षन आरोग्याची गुणवत्ता वाढीसाठी सर्वकष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे डॉ. खतगावकर म्हणाले.

फोटो : शिऊर येथील ग्रामसभेत बोलताना सरपंच नितीन चुडीवाल { छाया :सौरभ लाखे,शिऊर}
 
Top