मुख्याध्यापक - शिक्षक यांच्यात हाणामारी, परस्परविरोधी तक्रार 
शिऊर /सौरभ लाखे 
शिक्षकाचे प्रलंबित बिल न पाठविल्याच्या कारणावरून मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यात वाद झाला या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले अखेर दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, हा प्रकार शिऊर येथील संत बहिणाबाई कन्या प्रशालेत घडला.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शिऊर येथील संत बहिणाबाई कन्या प्रशालेत उत्तम सानप हे मुख्याध्यापक म्हणून तर पोपट आगवान हे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपले  प्रलंबित बिल काढण्यात यावे असे सहशिक्षक आगवान यांनी सानप यांना म्हणताच मुख्याध्यापक उत्तम सानप यांच्यासह बापू पवार व हरी तुपे यांनी आगवान यांना शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली हि घटना दि १४ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संत बहिणाबाई कन्या प्रशालेत घडली. दरम्यान आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आगवान यांनी दि १४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिऊर पोलिसांत दाखल केल्यानंतर मुख्याध्यापक उत्तम सानप यांनी देखील प्रशालेतील सहशिक्षक पोपट आगवान यांनी माझे प्रलंबित बील का पाठविले नाही म्हणून शिवीगाळ करून चापट बुक्य्याने मारहाण केल्याची तक्रार दि १५ रोजी शिऊर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या या मारहाणीची गावात चांगलीच चर्चा रंगली आहे.  
 
Top