शिऊर जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यास जि.प.प्रशासन उदासीन

पालक मेळाव्यात पालक व शालेय समितीने व्यक्त केला संताप

संजय पगारे I शिऊर
शिऊर जिल्हा परिषद प्रशालेतील पाच वर्षांपासून असलेल्या महत्वाच्या विषय शिक्षकांसह इतर रिक्त जागा भरण्यासाठी सर्व स्तराहुन वारंवार पाठपुरावा करण्यात येऊन देखील जिल्हा परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने पालकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत किमान इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक मिळावे यासाठी दि ११ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार पालक मेळाव्यात करण्यात आला आहे.

शनिवार ०५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिऊर जि.प.प्रशालेत शिक्षक व पालक मेळावा घेण्यात आला. यात शाळे संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत वाचता न येणारे २३ विद्यार्थ्यांवर लक्ष देऊन त्यांना विशेष शिकवणी देण्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेची वेळ दहा वरून ११ ते  ५ करणे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड ठरवणे आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. माजी विद्यार्थी शोषल मीडियाच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसवण्यासाठी करत असलेल्या निधी संकलनाची माहिती यावेळी देण्यात आली. प्रतिनियुक्तीवर गेलेल्या दोन शिक्षकामुळे शाळेचे नुकसान होत असल्याने त्या शिक्षकांचे वेतन थांबवण्यात यावे व या शिक्षकांना येथून कार्यमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. गुणवत्ता वाढीसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे राहत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर त्यामुळे परिणाम होत असल्याने रिक्त जागा भरण्यासाठी आता प्रशासनाला सळो की पळो करून सोडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. 

११ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर पालक विद्यार्थ्यांचा मोर्चा

पाच वर्षांपासून रिक्त असलेल्या इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र या विषयाच्या शिक्षकांसह, मुख्याध्यापक, लिपिक, पर्यवेक्षक आणि शिपायांच्या रिक्त जागा स्वातंत्र्य दिना पर्यंत भरण्यात याव्यात यासाठी मेळाव्यात युव्हरचना करण्यात येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा निश्चय झाला. शुक्रवार ११ जुलै  रोजी जिल्हा परिषदे समोर पालक आणि इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी तीव्र आंदोलन करणार आहेत. 'आता लढाई हक्कांच्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी' या धोरणानुसार आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.त्यामुळे शिऊर प्रशालेतील रिक्त जागा भरण्यासाठी पालक आणि प्रशासनात संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
यावेळी उपसरपंच जाकेर सय्यद, मुख्याध्यापक बी.के.घुले, शालेय समिती अध्यक्ष संतोष भागवत, गिरीश भावसार, नंदू जाधव, संजय जाधव, नितीन भावसार, वसंत पवार, अशोक चव्हाण, नाजीम पठाण,  बाबासाहेब जाधव, शहाबाज सय्यद, गौतम पगारे, भाऊसाहेब जाधव, दादासाहेब औटे, सुशील देशमुख, बाळू पवार, राजू पैठणपगारे,नंदू गायके, रमेश गवळी, मंगलबाई जाधव आदीसह पालक आणि सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

फोटो:
 
Top