संसाराला परमार्थाची जोड आवश्यक : इंदोरीकर महाराज
शिऊर / प्रतिनिधी
संसाराचे सुख क्षणिक असून पारमार्थिक सुख चिरकाल टिकते, संसाराला परमार्थाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन समाजप्रबोधनकार, विनोदाचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या २७२ व्या फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहमध्ये दि २९ रोजी सकाळच्या सत्रात त्यांचे कीर्तन झाले, आपल्या विशेष विनोदी शैलीने प्रबोधन करून उपस्थित भाविकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
या किर्तनास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हरीप्राप्तीसी उपाय,धरावे संतांचे ते पाय या संतपर अभंगावर त्यांनी विवेचन केले.
बाह्यज्ञानापेक्षा आत्मज्ञान आवश्यक असून संतविचारानेच आत्मज्ञान प्राप्त होते, कोणत्याही क्षेत्रात काम करतांना नीतीने व कष्ठाने करत सहनशक्ती वाढवून क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करत वृद्धाश्रम ही बाब दुर्दैवी असून आईच्या चेहऱ्यावर हसू व वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असलेला व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत असल्याचे इंदुरीकर म्हणाले.
