कपाशीवर बोण्ड अळीचा प्रादुर्भाव, लोकप्रतिनिधीनी सह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
शिऊर / सौरभ लाखे
शेतकऱ्यांचे पांढरे सोने असणाऱ्या कपाशीवर बोण्डअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या मुखातून हिरावून घेतला जात असल्याचे चित्र शिऊरसह परिसरात दिसून येत असून यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अस्मानी संकट कुठे दूर होत नाही तोच या अळीच्या माध्यमातून सुलतानी संकट आता शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. या कापूस पिकांची लोकप्रतिनिधींनी पाहणी केल्यानंतर गांभीर्याने लगेचच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना ही बाब सांगितल्यावर कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी देखील प्रादुर्भाव झालेल्या कपाशीची पाहणी केली.
बोण्डअळी कापसातील सरकी खात असल्याने याचा परिणाम वजनावर होत आहे, परिणामी उत्पनात घट होत आहे. शेवटच्या टप्प्यात वरूणराजाने कृपादृष्टी केल्याने नगदी पीक असलेल्या कपाशीचे उत्पन्न चांगले निघेल अशी अपेक्षा होती मात्र बोण्डअळीने अपेक्षाभंग केला असून उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र शिऊर परिसरात दिसत आहे.
कपाशी सर्वाधिक खर्चाचे पीक आहे , रासायनिक खतांसह विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करण्यासह वेचणीचा खर्च देखील वेगळा आहे यातच बोण्ड अळीने आपले बस्तान मांडले असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
साफियाबादवाडी येथील विवेक जाधव यांची सात एकर कपाशीवर या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असून या कपाशीची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, सरपंच नितीन चुडीवाल, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आढाव, मंगेश जाधव यांनी पाहणी केली व तात्काळ ही बाब कृषी विभागाला कळविली, कृषी विभागाचे पाटील, पुंड यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
ज्या शेतकऱ्यांचा कपाशीपिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनी "जी" हा विहित तक्रार अर्ज भरून त्यासोबत जमिनीचा सातबारा व कापूस बियाणे खरेदी पावती जोडून शिऊर येथील कृषी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन माजी जि प सदस्य सुनील पैठणपगारे यांनी केले आहे.
 
Top